एकान्हिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण थाटात
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : विदर्भ साहित्य संघ, नागपूरच्या वतीने आयोजित नाट्यतपस्वी राम जाधव स्मृती करंडक विदर्भस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत ‘दृष्टांत’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. ‘ओमेगा’ला द्वितीय, तर ‘द रोड शो’ला तृतीय क्रमांक मिळाला.
गुरुवारी या स्पर्धेची अंतिम फेरीत पार पडली. सकाळी ११ वाजेपासून सायंकाळ पर्यंत झालेल्या या अंतिम फेरीत एकूण सात एकांकिका सादर करण्यात आल्या. या स्पर्धेचे परीक्षण रमेश लखमापुरे, मृणाल पुराणिक आणि वंदना जिवने यांनी केले.
अंतिम फेरीनंतर झालेल्या पारितोषिक वितरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री परशुराम खुणे, तर विशेष अतिथी म्हणून हरीश इथापे उपस्थित होते. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, पराग धो́ngे आणि आसावरी तिखडे-गडेकर यांचीही उपस्थिती होती. विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले.
लेखन विभागात निरंजन मार्कंडेयवार यांना ‘द रोड शो’साठी प्रथम, अभय नवाथे यांना ‘दृष्टांत’साठी द्वितीय, तर चंद्रकांत चौधरी यांना ‘ओमेगा’साठी तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेत बक्षीस मिळण्यापेक्षा कलावंताला आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कला दडलेली असते आणि रंगभूमीच्या माध्यमातून ती प्रकट होते. त्यामुळे कलावंताच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि प्रोत्साहनाचा हात असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री परशुराम खुणे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. गिरीश गांधी यांनी झाडीपट्टी रंगभूमीच्या योगदानावर प्रकाश टाकला. नागपूरमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेमुळे कलावंतांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. हरीश इथापे यांनी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचा साधन नसून माणसांच्या मनाची मशागत करणारी आणि समाज घडवणारी सृजनभूमी असल्याचे सांगितले.














