मांगलीसह वरोरा तालुक्यात शोककळा
लोकवाहिनी न्यूज वरोरा : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील शाहपूरजवळ गुरुवारी (दि. १३) पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात वरोरा तालुक्यातील दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वकील राजू हेपट आणि राहुल कन्नके अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या कारची कंटेनरशी जोरदार धडक झाल्याने ही दुर्घटना घडली. अपघातात अन्य दोन मित्र किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी राजू हेपट, राहुल कन्नके आणि त्यांचे मित्र हे वरोरा येथून माँ बगुलामुखी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान १३ नोव्हेंबरच्या पहाटे शाहपूरजवळ त्यांच्या कारची कंटेनरशी भीषण धडक झाली.
धडकची तीव्रता इतनी होती की कारच्या मागील बाजूस बसलेले राजू हेपट आणि राहुल कन्नके यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन मित्र किरकोळ जखमी झाले. दाट धुक्यामुळे अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रवासात मांगली येथील वाहनचालक सूरज ढोके आणि पावडे यांचाही सहभाग होता. देवीच्या दर्शनासाठी आनंदाने सुरू झालेल्या प्रवासाचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजू भाऊ हेपट हे व्यवसायाने वकील असून त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा अनेकांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या आणि राहुल कन्नके यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, या घटनेमुळे मांगली गावासह संपूर्ण वरोरा तालुक्यात शोकमय वातावरण पसरले आहे.
















