नागपूर विद्यापीठाशी सामंजस्य करार
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : एनसीसी ऑफिसर यांच्या नेतृत्व गुणात वाढ व्हावी याकरिता व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्व कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी यांच्या दरम्यान विशेष कार्यशाळा आयोजित करण्याबाबत सामंजस्य करारावर करण्यात आला आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात सामंजस्य करार हस्तांतरण कार्यक्रम गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडला.
सामंजस्य करार हस्तांतरण कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर आणि एनसीसी ओटीए कामठीचे कमांडंट मेजर जनरल सरबजित सिंग बक्षी, (एसएम, व्हीएसएम) यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. विजय खंडाळ यांची उपस्थिती होती. या करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विजय खंडाळ आणि एनसीसी ओटीए कामठीच्या वतीने ब्रिगेडियर राजीव शर्मा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
एनसीसी ऑफिसर्स प्रशिक्षण अभ्यासक्रमानुसार व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्व कार्यशाळा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभागामार्फत आयोजित केली जाणार आहे. विभागाचे संचालक डॉ. समित माहोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि या कॅप्सूल कार्यक्रमाचे फायदे उपस्थितांसमोर सांगितले. करारानुसार ही दोन ते तीन दिवसांची कार्यशाळा दोन्ही संस्थांच्या परस्पर संमतीने ठरलेल्या तारखांना कामठी येथील अकादमीमध्ये होईल. नेतृत्व व नेतृत्वशैली, वेळ व्यवस्थापन आणि प्राधान्यक्रम, निर्णयक्षमता व समस्या निराकरण, संघ बांधणी, प्रभावी संवाद कौशल्य, भावनिक बुद्धिमत्ता तसेच प्रत्यक्ष व अनुभवाधारित शिक्षण या विषयांचा या कार्यशाळेत समावेश राहणार आहे. विद्यापीठ या कार्यशाळेसाठी प्राध्यापक व तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करेल, तर एनसीसी ओटीए प्रशिक्षणार्थी तुकड्या निश्चित करून वर्गखोल्या व दृकश्राव्य सुविधा उपलब्ध करून देईल.
समारंभास विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा कानेटकर, मानव्य विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मंगला हिरवाडे यांची उपस्थिती होती. नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभाग संचालक डॉ. प्रकाश इटनकर आणि वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, एनसीसी ओटीए कामठीतर्फे लेफ्टनंट कर्नल अनुपम चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी एनसीसी ऑफिसर यांना दिल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्व प्रशिक्षण कार्यशाळेबाबत विचार विनिमय करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक डॉ. समित माहोरे यांनी मान्यवरांचे आभार मानले.
















