लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या नियुक्ती आणि बदल्यांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी उच्च न्यायपालिकेत इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याकांच्या कमी प्रतिनिधित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून म्हटले आहे की, न्यायिक नियुक्तीसाठीच्या अलीकडील शिफारशींमध्ये गुणवत्ता आणि सर्वसमावेशकतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
तीन पानी पत्रात, न्यायमूर्ती गवई यांनी आरोप केला आहे की समाजाच्या एका विशिष्ट वर्गातील उमेदवारांना प्राधान्य दिले जात आहे. त्यांनी राष्ट्रपतींना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. या पत्राच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
कोणत्याही समाजाचे नाव न घेता न्यायमूर्ती गवई म्हणाले की, देशाच्या लोकसंख्येत पाच टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या एका समाजाला सर्वोच्च न्यायालयात ४० टक्क्यांहून अधिक प्रतिनिधित्व मिळाले आहे. सरकारी आकडेवारीचा हवाला देत, माजी सरन्यायाधीशांनी सांगितले की, २०१८ पासून उच्च न्यायालयांमध्ये नियुक्त झालेल्या ७१५ न्यायाधीशांपैकी केवळ २२ अनुसूचित जातीचे, १६ अनुसूचित जमातीचे, ८९ इतर मागासवर्गीय आणि ३७ अल्पसंख्याक समुदायांचे होते. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात, माजी सरन्यायाधीशांनी नमूद केले की, घटनात्मक न्यायालयांमधील प्रत्येक चार न्यायाधीशांपैकी अंदाजे तीन न्यायाधीश सामान्य प्रवर्गातील होते.
















