आमदार विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना सरकारकडून केवळ पाहणी दौरे सुरू आहेत. मंत्र्यांच्या दौरयांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा काजू-बदाम खाण्यावर भर असल्याचे टीका काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत केली आहे. महाराष्ट्र सरकार आणखी कशाची वाट पाहत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून निर्णय घेता आला असता. मात्र सरकारकडून चालढकल सुरू आहे. कोणत्याही विशिष्ट निकषाची वाट न पाहता तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस सुरुवातीपासून करत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. सरकारची नियत चुकीची असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना वडेट्टीवार यांनी, बोंद्रे यांच्यावर दबाव आणण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बदलल्याचे त्यांनी सांगितले. बोंद्रे यांच्यावर ईडी, सीबीआय यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
एसयायरच्या मुद्द्यावर वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्राच्या प्रारूप मतदार यादीत आधीच्या यादीच्या तुलनेत सुमारे २.०६ कोटी मतदारांची नावे समाविष्ट झालेली नाहीत. मात्र निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार यामध्ये अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदींसह विविध कारणांचा समावेश आहे आणि पात्र मतदारांना दावे-हरकती नोंदवण्याची संधी उपलब्ध आहे. मतदारांची नावे वगळून निवडणूक जिंकण्याचा डाव असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. आधी मतदान चोरी, नंतर आमदार चोरी आणि मग सरकारच चोरी, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे सरकार
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या निकषावरही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. २०२४ मधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विशेष शासन निर्णय काढून दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर करण्यात आली होती. आता निवडणूक संपल्यानंतर पुन्हा ही मर्यादा दोन हेक्टर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची सरकारची मानसिकता असल्याची टीकाही त्यांनी केली.
राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या टीकेवरही वडेट्टीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. युवक राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांच्या टीकेला फारसे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हटले.














