देशभारतील प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : द साऊथ पब्लिक स्कूल, ओळीकरनगर, नागपूर यांच्या वतीने नववी आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषद २२ ते २४ ऑक्टोबरदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मिहान, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. बदलत्या पिढ्यांच्या शैक्षणिक गरजा, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि भविष्यातील शिक्षणव्यवस्था यांबर विचारमंथन होणार आहे.
देशातील विविध राज्यांतील नामंकित शाळांचे प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत. सनफ्लॉवर, टायची, मॅजिक पिटारा आणि सरस्वती पब्लिकेशन यांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
२२ ऑक्टोबर रोजी आयआयएम कोझिकोडचे संचालक प्रा. देबाशीष चॅटर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कलाकार वासुदेव कामत विशेष अतिथी असतील. शिक्षणतज्ज्ञ डॉ. माला पलानी, भारतीय रंगभूमीवरील प्रसिद्ध व्यक्तित्व संजना कपूर और परिषदेच्या संयोजिका डॉ. मृणालिनी दस्तुरे यांच्यासह विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी वासुदेव कामत, मेमरी ट्रेनर व गिनीज वर्ल्ड रिकॉर्डधारक अदिती सिंघल आणि आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांची व्याख्याने होतील. परिषदेच्या निमित्ताने ‘पाथेय – द गोल्डन एलेक्सिर’ या ई-स्मारिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि प्रसिद्ध अभिनेते व माजी खासदार डॉ. नीतीश भारद्वाज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्मारिकेत भारतसह परदेशातील प्राचाऱ्यांचे शिक्षणविषयक संशोधनपर लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.
यावेळी ‘नचिकेता’ आणि ‘सुपर नचिकेता’ पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. रझिया हुसेन आणि श्रद्धा केल्लापूरे यांचा सन्मान करण्यात येईल, तसेच प्रा. देबाशीष चॅटर्जी, वासुदेव कामत आणि डॉ. नीतीश भारद्वाज यांनाही शिक्षण व संस्कृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
द साऊथ पब्लिक स्कूलचे संचालक देबेन दस्तुरे आणि सनफ्लॉवर राजेश घई यांच्या पुढाकाराने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेला परिषदेच्या संयोजिका डॉ. मृणालिनी दस्तुरे, सल्लागार मंडळाच्या सदस्या रीना दर्गन, आयोजन समितीच्या सदस्या श्रद्धा केल्लापूरे तसेच सदस्य दिग्विजये दस्तुरे आणि मंगेश चिनेवार उपस्थित होते.













