अंतिम निकाल रात्री उशिरा येण्याची शक्यता
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात आहेत. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे ही मोजणी सकाळी ८ वाजतापासून सुरू होईल. एकूण २४ टेबलवर मतमोजणी होणार आहे, तर, अंतिम निकाल रात्री उशिरा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीचे सुधाकर कोहळे की महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. मतमोजणीच्या प्राथमिक टप्प्यात टपाल मतपत्रिका बाहेर काढून वेगवेगळ्या केल्या जातील.
डिक्लेरेशन नसलेले, फाटलेले किंवा संशयास्पद वाटणाऱ्या मतपत्रिका स्वतंत्र पेटीत ठेवण्यात येतील, त्यांची तपासणी करून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. निवडणुकीत ३८ उमेदवार असल्याने प्रत्येकासाठी स्वतंत्र पेटी आणि संशयास्पद मतपत्रिकांसाठी एक स्वतंत्र पेटी, अशा एकूण ३९ पेट्या असतील.
सहा जिल्ह्यांतील ४४५ मतदान केंद्रांवर एकूण १ लाख ६५ हजार ६७२ मतदारांनी मतदान केले. प्रत्येक टेबलवर एकत्रेली सुमारे एक हजार मतपत्रिकांची मोजणी होईल. प्रथम क्रमांकाच्या मतांची मोजणी होईल, त्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील पसंतीक्रमानुसार मतमोजणी होईल. त्यामुळे केवळ प्रथम पसंतीचे मतेच नव्हे, तर मतपत्रिकांवरील पुढील पसंती निकालात निर्णायक ठरू शकते. त्यामुळे मतदानाच्या एकूण संख्येनुसार पाच ते सहा फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता असून, संपूर्ण प्रक्रिया रात्री १० वाजतापर्यंत किंवा त्यानंतरही सुरू राहू शकते.
रिंगणातील उमेदवार
पदवीधर मतदारसंघासाठी ३८ उमेदवार रिंगणात उभ्या ठाकल्या गेले होते. यात सुधाकर कोहळे (भाजप), ॲड. अभिजित वंजारी (काँग्रेस), मंगेश वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), श्रीधर साळवे (भीम सेना), अतुल देशमुख (समाजवादी गणराज्य पार्टी), सिद्धार्थ निकोसे (बलीराजा पार्टी), तर अपक्ष उमेदवारांमध्ये प्रा. अनिल सोले, अरविंद लिल्हारे, अशोक लांजेवार, आनंद मेश्राम, उत्तमप्रकाश शहारे, सचिन काळबांडे, सुरेंद्रकुमार खोब्रागडे, गजानन लोखंडे, गीता मेहर, राजकुमार गेडाम, दुर्गावती सरीयाम, प्रा. देवराम नंदनवार, नरेश पिल्ले, नरेंद्र पाटील, नितीन नागदेवते, नितेश कराळे, पराग भोंगाडे, प्रशांत पिंपळे, प्रज्ज्वल गावंडे, ॲड. प्रदीप सोमनकुवर, बिपिन तुपे, धनंजय बोरकर, शरद भांडारकर, मनोज म्हेंडे, मंजुल गेडाम, रघुनाथ सोलटक्के, राजेंद्र आत्राम, रोहन साठवणे, विनायक अवचट, सुमेध गडपायले, ॲड. संदीप शेंडे व संजय थूल यांचा समावेश आहे













