नागपूर : सिनेरसिकानं रणबीर कपूर व साई पल्लवी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची प्रतीक्षा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रामायण प्रेक्षकांपुढे येणार असल्याने या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. याच चित्रपटात रामाची भूमिका करणारा रणबीर कपूर व सीतेची भूमिका साकारणारी साई पल्लवी नागपूरजवळॉल रामटेक येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याने रामटेकवासी त्यांच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत.
रामायण या चित्रपटाचे प्रमोशन देशभर सुरू असून धार्मिक स्थळांचाही यात समावेश आहे. नागपूरपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकचा रामायण कथेशी घनिष्ठ संबंध जोडला जातो. वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम रामटेक परिसरात वास्तव्यास होते, अशी श्रद्धा आहे. येथे श्रीरामाचे भव्य मंदिर असून येत्या ११ ऑक्टोबरला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारा रणबीर कपूर आणि सीतेची भूमिका करणारी साई पल्लवी रामटेक गडावरील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येणार आहे, अशी माहिती वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली.
दिग्दर्शक नितेश तिवारी व लक्ष्मणाचे पात्र साकारणारा रवी दुबेही यावेळी येणार आहे. चित्रपटातील एका गाण्याचे लोकार्पण या मंदिरात करण्यात येणार आहे. हा दौरा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा एक भाग आहे, सप्टेंबरच्या अखेरीस मुंबईत झालेल्या विशेष कार्यक्रमात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि चित्रपटाच्या अन्य कलाकारांची उपस्थिती होती.













