सोनेगाव आमराईत पक्ष्यांचा किलबिलाट
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : येथील दक्षिण-पश्चिम भागात असलेली भोसलेकालीन सोनेगाव आमराई सध्या विदेशी आणि स्थानिक पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजली आहे. गुलाबी थंडीच्या आगमनासोबतच सायबेरिया, रशिया आणि मंगोलियासारख्या अतिथंड प्रदेशांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी या आमराईत दाखल झाले आहेत. तब्बल ३५०० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या तैगा फ्लायकॅचरसह विविध दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरत आहे. ऐतिहासिक वारसा, हिरवाई आणि जैवविविधतेने समृद्ध असलेली ही आमराई सध्या पक्ष्यांचे हिवाळी आश्रयस्थान बनली आहे.
सोनेगाव आमराई आणि लगतचा सुमारे ४० एकरांचा विस्तीर्ण जंगल परिसर सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी नागरिकांचे आवडते ठिकाण आहे. वॉकिंग, रनिंग, सायकलिंग आणि योगाभ्यासासाठी येथे नागरिकांची नियमित गर्दी असते. मात्र, सध्या या परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य समोर आले आहे. हिवाळ्याच्या हंगामात परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी येथे मुक्काम ठोकला आहे. पक्षी अभ्यासक विशाल अभ्यंकर यांच्या माहितीनुसार, सायबेरिया, रशिया आणि मंगोलियासारख्या अतिथंड प्रदेशांतून अनेक पक्षी नागपुरातील सोनेगाव आमराईत दाखल झाले आहेत.
यंदाच्या हिवाळ्यात आमराईत दिसणाऱ्या पक्ष्यांमध्ये तैगा फ्लायकॅचर विशेष आकर्षण ठरत आहे. रशिया, सायबेरिया आणि युरोपमधील थंड प्रदेशांतून सुमारे ३५०० किलोमीटरचा प्रवास करून हा छोटासा पक्षी नागपुरात पोहोचला आहे. याशिवाय ब्लू कॅप रॉक थ्रश अर्थात निळ्या टोपीचा कस्तुर आणि रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर या स्थलांतरित पक्ष्यांचेही दर्शन होत आहे. निळ्या टोपीचा कस्तुर प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडच्या भागात आढळतो. हिवाळ्यात तो दक्षिण भारताच्या दिशेने स्थलांतर करतो. या प्रवासादरम्यान मध्य भारतातील नागपूर आणि सोनेगाव आमराईत काही काळ विसावा घेतो. हिवाळ्यात युरोप, रशिया, सायबेरिया आणि मंगोलियातून येणारे पक्षीही या परिसरात आश्रय घेतात.
विदेशी पाहुण्यांसोबतच आमराईत अनेक स्थानिक पक्ष्यांचेही दर्शन घडत आहे. पक्षी अभ्यासक आणि निरीक्षकांनी ग्रे हॉर्नबिल (धनेश), ऑरेंज हेडेड फ्लायकॅचर (नारिंगी डोक्याचा कस्तुर), आशियाई पॅराडाइज कस्तुर (स्वर्गीय नर्तक) आणि कॉमन हॉक कूकू (पावश्या) अशा विविध पक्ष्यांची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, आमराईतील पुरातन बारव अर्थात विहिरीजवळ दररोज सकाळी पोपटांचे थवे एकत्र येतात. त्यामुळे या परिसरात जणू पोपटांची शाळाच भरत असल्याचे मनोहारी दृश्य पाहायला मिळते.
जैवविविधतेचे जतन करण्याची गरज
सोनेगाव आमराईचे महत्त्व केवळ पक्ष्यांपुरते मर्यादित नाही. या परिसरात भोसलेकालीन मुत्सद्दीपर मंदिर, हनुमान मंदिर आणि पुरातन बारव आहे. तसेच वड, कडुनिंब आणि पिंपळ यांसारखे अनेक जुने वृक्ष या परिसराची नैसर्गिक समृद्धी टिकवून आहेत. दरवर्षी हिवाळ्यात विविध प्रजातींचे विदेशी पक्षी या आमराईत येतात आणि काही काळ मुक्काम करतात. त्यामुळे या परिसराचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित होते. या नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचे संरक्षण व संवर्धन करण्याबरोबरच परिसर कचरामूक्त ठेवणे आवश्यक आहे. नागरिकांनीही या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य आणि पक्ष्यांचे अधिवास जपण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ‘वुई लव्ह सोनेगाव आमराई’ ग्रुपचे प्रवर्तक सचिन दबकेर यांनी केले आहे.















