व्हीएसआरला वाचवले जात असल्याचाही आरोप
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणात अद्याप व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर दाखल का करण्यात आलेली नाही. दादांच्या आठवणींमुळे आजही मला झोप लागत नाही. व्हीएसआर कंपनीच्या संचालकांचे ड्रग्ज आणि सोने तस्करांशी संबंध असल्याचे समोर येत असतानाही सरकारकडून या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न का केला जात आहे? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर या कंपनीला तब्बल १६८ कोटी रुपये देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या. अजित पवार यांच्या अपघातानंतर त्यांचा चेहरा पाहिला आहे. त्या आठवणी आजही डोळ्यांसमोर येतात. त्यामुळे झोपही लागत नाही. या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
रोहित पवार म्हणाले, व्हीएसआर कंपनीच्या विमानातून मोदी देखील प्रवास केला आहे. मात्र, अजितदादांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या कंपनीच्या संचालकांचे ड्रग्ज आणि सोने तस्करांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. छोट्या-छोट्या घटनांमध्ये पोलिसांकडून एफआयआर दाखल केली जाते. मात्र, दादांच्या अपघातप्रकरणी अद्याप व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. या कंपनीबाबत आम्ही जे प्रश्न उपस्थित करत आहोत, त्यांची उत्तरे केवळ आम्हालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला हवी आहेत.
या प्रकरणावर सरकारकडून कोणतेही ठोस उत्तर दिले जात नाही. केवळ भाजपचे प्रवक्ते बोलत आहेत. त्यांना ही माहिती कुठून मिळते, हे त्यांनाच माहीत. सरकारने या प्रश्नांची उत्तरे दिल्यास अनेक गोष्टी स्पष्ट होतील. माझे पुतळे जाळले तरी चालतील; मात्र या प्रकरणावर मला राजकीय आरोप-प्रत्यारोप करायचे नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. भाजपने राजकीय नव्हे, तर तांत्रिक मुद्द्यांवर उत्तरे द्यावीत. व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी केला. अजित पवार यांच्या अपघाताचा विषय सर्वच जण वेगवेगळ्या पद्धतीने पुढे नेत आहेत. राहुल गांधी यांची भेट सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातूनच झाली. कर्नाटकामध्ये काँग्रेसमुळेच शून्य एफआयआर दाखल झाली. पार्थ पवार आणि जय पवार हेही त्यांच्या पद्धतीने हा विषय हाताळत आहेत. उद्धव ठाकरे हेदेखील या प्रकरणात मदत करत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
आमचा एकही खासदार जाणार नाही
दरम्यान, शरद पवार गटाचा एकही खासदार पक्षाला सोडणार नसल्याचा दावा रोहित पवार यांनी व्यक्त केला. शरद पवारांसोबत सर्व खासदारांचे एक भावनिक नाते जुळलेले आहे. त्यामुळे ते इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. मतदारसंघ पुनर्रचनेचा (डिलिमिटेशन) मसुदा समोर आल्यानंतर त्यावर भाष्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.















