लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख असणाऱ्या मारबत महोत्सवाला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत असून, येत्या ११ सप्टेंबर रोजी आयोजित मारबत महोत्सवासाठी मनपा सज्ज आहे. महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. बडग्या-मारबत महोत्सवात सर्वांना उत्तम सोयीसुविधा पुरवण्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे महापौर नीता ठाकरे यांनी सांगितले.
नागपूरची पारंपरिक व ऐतिहासिक ओळख असणाऱ्या ‘मारबत महोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करण्यासाठी महापौर ठाकरे यांच्या अध्यक्षतेत मंगळवार (ता. ८) बैठक पार पडली. बैठकीला स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, विवेक रानडे, गजानन रानडे यांच्यासह इतर उपस्थित होते.
नागपूर शहरात पर्यटकांचा ओघ वाढविण्याच्या सहशहराचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी तसेच नागपूरचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी मनपाद्वारे मारबत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
बैठकीत महापौरांनी मारबत मार्गावर भ्रमण करणाऱ्या नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. सोबतच महोत्सवात येणाऱ्या नागरिकांना उत्तम सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात असेही निर्देश त्यांनी दिले. मारबत व बडग्या यांच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची व्यवस्था करण्याच्या सूचना नरेंद्र बोरकर यांनी दिल्या.
तसेच महोत्सवासाठी परदेशातून येणाऱ्या वाणिज्य राजदूत/परदेशी प्रतिनिधी, मंत्री, लोकप्रतिनिधी, सिनेअभिनेता आदी मान्यवरांच्या शिष्टाचाराचे उत्तम पालन करण्यात यावे, अशी सूचना शिवानी दाणी वखरे यांनी केली. बैठकीच्या प्रारंभी क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी मारबत महोत्सवाच्या नियोजनासह महोत्सवाअंतर्गत आयोजित भजन संध्या, छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी आदी विविध उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.












