प्रकरणाच्या चौकशीनंतर पुढील कारवाई होणार
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : आयआयटी मुंबईतील २२ वर्षीय विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याच्या आत्महत्येनंतर संस्थेतील वातावरण तणावपूर्ण झाले असून, या प्रकरणी विद्यार्थी व्यवहार विभागाचे डीन प्रा. सूर्यनारायण दुला यांना डीन पदावरून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष बी. केदारे यांनी दिली.
साहिलच्या मृत्यूबाबत यापूर्वी संस्थेकडून देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीसाठी आयआयटी मुंबईने माफी मागितली असून, त्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. संस्थेने स्पष्ट केले की, प्रा. दुला यांना केवळ डीन पदावरून निलंबित करण्यात आले आहे. साहिल हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होता. तो आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात बी.टेकच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. शुक्रवारी संध्याकाळी पवई कॅम्पसमधील वसतिगृहात त्याचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या काही तास आधी मध्य-सत्र परीक्षेदरम्यान साहिल मोबाईल फोन वापरून प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड करताना पकडला गेला होता. या घटनेनंतर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती. दरम्यान, साहिलच्या कुटुंबांनी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेवर गंभीर आरोप केले आहेत. साहिलला संस्थात्मक छळ आणि जातीय भेदभावचा सामना करावा लागल्याचा त्यांचा आरोप आहे. परीक्षेतील प्रकारानंतर त्याच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला आणि शिक्षणातून निलंबित करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केला आहे.
साहिलच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एका प्राध्यापकाचे नाव आरोपी म्हणून देण्यात आले असून, तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. तसेच, अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ २० सप्टेंबरच्या रात्री शेकडो विद्यार्थी आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वराजवळ जमले होते. संचालक शिरीष केदारे यांनी विद्यार्थ्यांशी सुमारे तीन तास चर्चा केली. आरोपी प्राध्यापकाचे निलंबन, निष्पक्ष चौकशी, सार्वजनिक माफी आणि साहिलच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई यासह विद्यार्थ्यांनी १८ मागण्या केल्या. प्रशासनाने या सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगण्यात आले आहे. आयआयटी मुंबईने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित प्राध्यापकांनी साहिलशी संवाद साधला होता आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम होणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, आयआयटी मुंबई फॅकल्टी फोरचने प्राध्यापकाला पाठिंबा दिला आहे. प्राध्यापकांनी संस्थेच्या सिनेटने मंजूर केलेल्या नियमांनुसारच आपले कर्तव्य बजावले, असे फोरचने म्हटले आहे.













