नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), मध्ये निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मृतकाच्या संतप्त नातेवाईकांनी थेट आयसीयूमध्ये घुसून मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि अन्य वरिष्ठ डॉक्टर उपस्थित असतानाच निवासी डॉक्टरची कॉलर पकडून त्याला खाली पाडले आणि मारहाण केली. त्यानंतर निवासी डॉक्टरांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली असून, रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने गुरुवारपासून अत्यावश्यक नसलेल्या बाह्यरुग्ण (ओपीडी) आणि अंतररुग्ण (आयपीडी) सेवा बेमुदत बंद करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला.
या घटनेत एका खासदाराच्या नावाचा वापर झाल्याचा धक्कादायक आरोप करत डॉक्टरांनी प्रशासनाला थेट बेमुदत संपाचा इशारा दिला.
गुरुवारी निवासी डॉक्टरांनी धरणे आंदोलनास सुरुवात केली. संघटनेने नियमित रुग्णसेवेतून माघार घेण्याची सूचना प्रशासनाला दिली आहे. मारहाणीतील आरोपींवरील कारवाईबरोबरच डॉक्टरांची सुरक्षा, राजकीय शिफारस आणि खाटावाटपाबाबतही संघटनेने प्रश्न उपस्थित केले आहेत.
निवासी डॉक्टर संघटनेच्या पत्रानुसार, २२ सप्टेंबरला वैद्यकीय अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. त्यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा संघटनेचा आरोप आहे. घटनेनंतर २३ सप्टेंबरला मांडलेल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. प्रशासनाने सर्व मागण्यांवर समाधानकारक, लेखी आणि कालबद्ध उत्तर देईपर्यंत ही भूमिका कायम राहील. आपत्कालीन उपचार आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू राहतील, असे २४ सप्टेंबरच्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
संस्थेच्या वतीने तक्रार दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तक्रार पीडित डॉक्टरच्या नावाने नोंदवली गेल्याचा संघटनेचा दावा आहे. संस्थेने तक्रारीची जबाबदारी घ्यावी आणि मारहाणीत सहभागी सर्वांची ओळख पटवून २४ तासांत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलक निवासी डॉक्टरांनी केली आहे.
मारहाणीच्या घटनेशी संबंधित रुग्ण किंवा नातेवाईकांच्या संदर्भात एका खासदाराचे नाव वापरले गेल्याचा संघटनेने आरोप केला आहे. या घटनेत एका खासदाराच्या नावाचा वापर करून दबाव आणण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित खासदारांनी जाहीर खुलासा करावा तसेच त्यांना एम्स नागपूरच्या अधिकृत/वैधानिक मंडळातून तत्काळ हटवण्यात यावे, अशी आक्रमक मागणी डॉक्टरांनी लावून धरली आहे.
खाटावाटपासाठी आजाराची तीव्रता विचारात घेणारे समान नियम लागू करावेत, अशी मागणी पत्राच्या माध्यमातून संघटनेने केली आहे. राजकीय नेत्यांच्या पत्रावरून वेटिंग लिस्ट डावलून थेट खाटा (बेड) मिळवून देण्याची ‘व्हीआयपी संस्कृती’ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारामुळे सामान्य रुग्णांवर अन्याय होतो आणि नेत्यांच्या दबावामुळे नातेवाईक उद्धटपणे वागून डॉक्टरांवर हात उचलतात, असा संताप डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. ■
सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करा
सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, हिंसाचाराच्या प्रसंगी चोवीस तास तत्पर पथक, अतिदक्षता विभागासारख्या संवेदनशील ठिकाणी धोक्याची सूचना देणारी यंत्रणा आणि निवासी डॉक्टरांचा सहभाग असलेली समिती स्थापन करण्याची मागणी आहे. पीडित डॉक्टरला आवश्यक विश्रांती व मानसिक आधार देण्याची मागणी संघटनेने केली आहे.














