मुंबई : राज्यातील बहुतांश भागात पावसाने लांब दांडी मारल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक भागांत पावसाअभावी दुष्काळाची दाहकता जाणवू लागली असून, दुसरीकडे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसच उकाड्याचा जोर वाढला आहे. पावसाचे कोणतेही ठोस संकेत नसताना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येत आहे.
मुंबईत रविवारी कुलाबा हवामान केंद्राने ३३.२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवले, जे सामान्य तापमानापेक्षा २.३ अंश सेल्सिअसने अधिक होते. तर किमान तापमान २७.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा २.१ अंश सेल्सिअसने अधिक होते.
नाशिक जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाची तब्बल ७० टक्के तुट नोंदवण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यातील कमाल तापमानात तब्बल सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येही तापमानाचा पारा ३५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून, सप्टेंबर महिन्यातील हे मागील २५ वर्षांतील उच्चांकी तापमान असल्याची माहिती आहे. शहरातील तापमान सातत्याने ३० अंशांच्या पुढे राहत असल्याने नागरिक उकाड्याने हैरान झाले आहेत. रविवारी राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. सोलापूर आणि अमरावतीमध्ये ३६ अंश सेल्सिअस, तर अकोल्यात ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आगामी काळातही तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असल्याने उकाड्यात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात पूरस्थिती सलग चौथ्या दिवशीही कायम आहे. भामरागड गावात शिरलेले पाणी काही प्रमाणात ओसरले असले तरी पर्लकोटा नदीच्या पुलावर अद्याप चार फूट पाणी असल्याने आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे चाळीसहून अधिक गावे अद्याप संपर्काच्या बाहेर असून, नागरिकांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा आहे.
दुसरीकडे, भंडारा जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे. पूर्व विदर्भातील महत्वाच्या गोसेखुर्द प्रकल्पात सध्या ७६ टक्के पाणीसाठा आहे, तर बावनथडी प्रकल्पात केवळ ३६.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. चांदपूर, बघेडा यासह चार मध्यम प्रकल्पांमध्ये ५९.७० टक्के, ३१ लघु प्रकल्पांमध्ये ६८.८९ टक्के आणि २८ मालगुजारी तलावांमध्ये ७९.३० टक्के पाणीसाठा आहे. खरीप हंगामातच जलसाठ्याची ही स्थिती असल्याने आगामी रब्बी हंगामात शेतकरी आणि नागरिकांसमोर जलसंकट उभे राहण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.












