मसकऱ्या गणेशोत्सवाला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत मसकऱ्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. नागपूरची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, तापैकी एक हा गणेशोत्सव आहे. ही ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण परंपरा शेकडो वर्षांपासून भोसले घराण्याने अतिशय आदराने जपली आहे. हा गणेशोत्सव केवळ एक धार्मिक उत्सव नसून नागपूर शहराची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि वैभवशाली सांस्कृतिक ओळख बनला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
महाल येथील सीनियर भोसला पॅलेस येथे श्री महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या ऐतिहासिक ‘मसकऱ्या गणपती’च्या दर्शनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत राजे रघूजी महाराज भोसले (पंचम), राजे मुधोजी भोसले आणि राजे जयसिंह भोसले आदी उपस्थित होते.
सीनियर भोसला पॅलेस येथे आगमन होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी नागपूरच्या भोसले घराण्याच्या वतीने त्यांचे सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूरकर भोसले घराण्याचा इतिहास अत्यंत जाज्वल्य आणि दीदीप्यमान राहिला असून, पूर्वेकडे हिंदवी स्वराज्याचा विस्तार करण्यात या घराण्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेला आहे. आजच्या काळातही सर्व ऐतिहासिक प्रथा आणि परंपरा मुधोजी राजे भोसले यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अतिशय उत्साहात पार पडत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.












