नावी नातेसंबंध, कुटुंब आणि भावभावनांवर आधारित ‘कापुसकोंडा’ या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. सत्यघटनेपासून प्रेरणा घेतलेली या चित्रपटाची कथा वेगळी असून, चित्रपट २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पॅनेरोमा स्टुडिओज प्रस्तुत आणि व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीजसह स्टोरीवाला फिल्म सादर करत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जास्कंद एंटरटेनमेंट्स प्रा. लि. यांनी केली आहे. सचिन मोहिते यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरई यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह अक्षता पाडगावकर, जान्हवी तांबे आणि भूषण पाटील यांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले हे अनेक वर्षांनंतर या चित्रपटातून पुन्हा एकत्र दिसणार आहेत.
‘कापुसकोंडा’चे बहुतांश चित्रिकरण लातूर जिल्ह्यातील अंधोरी गावात करण्यात आले आहे. निवृत्त कर्मचारी आणि त्याला भेट म्हणून मिळालेला कुत्रा यांच्यातील नात्याभोवती चित्रपटाची कथा फिरते. एका कुत्र्यामुळे कुटुंबात घडणाऱ्या विविध घटना आणि त्यातून समोर येणाऱ्या मानवी भावना, नाती आणि कौटुंबिक संबंध यांची गोष्ट चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘अ फॅमिली डॉग फिल्म’ अशी चित्रपटाची टॅगलाईन असून, टीझरमुळे चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी चित्रपटाला संगीत दिले असून, अवधूत गुप्ते आणि पद्मनाभ गायकवाड यांनी गाणी गायली आहेत. २३ ऑक्टोबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.













