लोकवाहिनी न्यूज
नागपूर : दीक्षाभूमी ही केवळ नागपूर शहराची ओळख नसून संपूर्ण देशातील आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक स्थळाशी संबंधित वाद सार्वजनिक चर्चेचा विषय ठवरून त्याच्या प्रतिशेला धक्का पोहोचत असेल, तर ही बाब गंभीर आहे. स्मारक समितीने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने आत्मपरीक्षण करावे, अन्यथा आंबेडकरी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे.
समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पवित्र भूमीतून दिली, त्याच ऐतिहासिक दीक्षाभूमीची विविध वादांमुळे बदनामी होत असल्याबद्दल डॉ. राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेतून त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी प्रतिषेचा संदेश दिला. त्यामुळे दीक्षाभूमीशी कोट्यवधी अनुयायांच्या भावना जोडलेल्या आहेत. या पवित्र स्थळाची प्रतिष्ठा जपणे आणि त्याचे व्यवस्थापन पारदर्शक पद्धतीने करणे ही स्मारक समितीची महत्त्वाची जबाबदारी आहे. समितीशी संबंधित वादांमुळे दीक्षाभूमीची प्रतिमा मलिन होणे आंबेडकरी जनतेसाठी वेदनादायी असल्याची भूमिका डॉ. राऊत यांनी मांडली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या विविध भागातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर अभिवादनसाठी येतात. या ऐतिहासिक दिवसाचे महत्व लक्षात घेता, दीक्षाभूमीशी संबंधित वादांचे निराकरण करून येथे बाबासाहेबांचा विचार आणि बुद्धांचा धम्माचा संदेश केंद्रस्थानी राहील, यासाठी समितीने प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
स्मारक समितीने निर्माण झालेल्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडावी. दीक्षाभूमीची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत आणि जनतेच्या भावनांचा आदर करावा, अशी अपेक्षा डॉ. राऊत यांनी व्यक्त केली. केवळ औपचारिक भूमिका घेऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून जबाबदारी सिद्ध करण्याची गरज असल्याचे या प्रकरणावरून अधोरेखित होत आहे. स्मारक समितीशी संबंधित वादांमुळे नागपूरमधील प्रतिष्ठित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचीही बदनामी झाल्याचा मुद्दा डॉ. नितीन राऊत यांनी उपस्थित केला. शिक्षण, प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाच्या मूल्यांशी जोडलेल्या या संस्थेची प्रतिष्ठा जपणे आवश्यक आहे. दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाशी संबंधित संस्थाविषयी जनमानसात आदराची भावना आहे, त्यामुळे अशा संस्थांच्या प्रतिमेवर परिणाम करणाऱ्या वादांचे गांभीर्याने निराकरण होणे गरजेचे आहे.
बाबासाहेबांच्या विचारारांचा वारसा जपण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या संस्थाेशी संबंधित वादांमुळे त्यांच्याच प्रतिमेला धक्का पोहोचत असेल, तर संबंधित व्यवस्थापनाने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. संस्थांची प्रतिष्ठा आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि योग्य व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे, असा संदेश डॉ. राऊत यांच्या भूमिकेतून पुढे आला आहे. स्मारक समितीने तातडीने आत्मपरीक्षण करून दीक्षाभूमीची बदनामी थांबवावी, संबंधित वादांवर तोडगा काढावा आणि आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर करावा. अन्यथा जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा डॉ. राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर स्मारक समिती या इशारेची दखल घेऊन कोणती भूमिका घेते, याकडे आंबेडकरी समाजाचे लक्ष लागले आहे.
आंबेडकरी जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष नको
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक समता, मानवी हक्क आणि वैचारिक मुक्तीचा ऐतिहासिक दिवस आहे. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीशी संबंधित वादापेक्षा बाबासाहेबांचा परिवर्तनवादी विचार आणि धम्माची शिकवण देशभर पोहोचवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे राऊत म्हणाले.














