ब्रिटनसोबत भागीदारी मजबूतीवर मुख्यमंत्र्यांचा भर
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण आहे. कौशल्य, भांडवल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यात विविध क्षेत्रातील उद्योग उभारण्याच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे ब्रिटनमधील संस्था आणि उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उद्योगांसाठी आवश्यक सुविधा आणि योग्य वातावरण निर्माण करण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा विश्वासाही त्यांनी व्यक्त केला.
मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित महाराष्ट्र-ब्रिटन भागीदारी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी ब्रिटनच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर महाराष्ट्र आणि ब्रिटनदरम्यान झालेल्या सामंजस्य करारांचे आदानप्रदान करण्यात आले. या भागीदारीतून दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होतील, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकर सुरू व्हावेत आणि त्यांना विविध सरकारी विभागांकडून आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या व्यासपीठाचा उपयोग केला जाईल, या माध्यमातून संबंधित विभागांमध्ये तातडीने समन्वय साधण्यात येईल. ब्रिटनच्या सचिव, महापौयर आणि अधिकाऱ्यांचा दौरा केवळ औपचारिक भेट नसून, दोन्ही देशांतील सहकार्याचे रूपांतर प्रत्यक्ष उद्योग, व्यवसाय आणि करारांमध्ये करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय वित्त, व्यापार आणि उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र आहे. पुणे शहराने अभियांत्रिकी, वाहननिर्मिती, उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विशेष प्रगती केली आहे. राज्यातील कुशल मनुष्यबळ, औद्योगिक समूह आणि जागतिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या कंपन्यांचे जाळे ही महाराष्ट्राची ताकत आहे. त्यामुळे राज्यात गुंतवणूक करण्यासाठी परदेशी कंपन्यांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत, असे फडणवीस म्हणाले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्याची संधी मिळाली आहे. ब्रिटनमधील ब्रिस्टल, यॉर्क आणि अर्डर्डन यांसारखी विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत. तसेच राज्यात उभारण्यात येणाऱ्या एन्युजीसिटी, मेडिसिटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील इननोवेशन सिटीमुळे शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळेल. यामुळे जागतिक दर्जाच्या संस्था आणि कुशल व्यक्तींना एकत्र काम करण्याची संधी मिळेल.
स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातही महाराष्ट्रात मोठ्या संधी आहेत. औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जेचा योग्य वापर, पाणी व्यवस्थापन, वाहतूक आणि साधनांच्या पुनर्वापर यांसारख्या क्षेत्रात ब्रिटनमधील कंपन्या गुंतवणूक करू शकतात. जागतिक कंपन्यांनी राज्यात जागतिक क्षमता केंद्र आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्र सुरू केल्यास सरकार पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि लघुउद्योजकांना ब्रिटनच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची संधी मिळेल. नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासोबतच व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीलाही मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ब्रिटनचे व्यवसाय, नवनिर्मेश, विज्ञान आणि व्यापार मंत्री जोनाथन रेनॉल्थ म्हणाले, की भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या ब्रिटिश कंपन्यांसाठी महाराष्ट्र योग्य ठिकाण आहे. राज्याची आर्थिक ताकद, राजकीय स्थैर्य आणि सक्षम नेतृत्व यामुळे महाराष्ट्राची निवड करण्यात आली. केवळ करारानंतर स्वाक्षरी करणे हा दौऱ्याचा उद्देश नसून, प्रत्यक्ष परिणाम साधून दोन्ही देशांच्या प्रगतीला गती देणे हे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला राज्यशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आणि ब्रिटनमधील विविध विभागांचे सचिव, व्यापार अधिकारी व महापौयर उपस्थित होते.











