माफी मागावी, सतीश सालियन यांची मागणी
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : दिवंगत दिशा सालियन यांच्या वडिलांनी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटिस पाठवली आहे. काही वक्तव्यांमुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी झाल्याचा दावा सतीश सालियन यांनी केला आहे. दोन्ही नेत्यांनी सात दिवसांत बिनशर्त माफी मागावी, आपली वक्तव्ये मागे घ्यावीत आणि ५०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नोटिसमध्ये करण्यात आली आहे.
ही नोटिस वकील अनुष्का सोनावणे यांच्यामार्फत पाठवण्यात आली आहे. नोटिसमध्ये आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी सतीश सालियन यांच्या वक्तव्यांबाबत तसेच त्यांच्या कायदेशीर कार्रवाईबाबत केलेल्या कथित वक्तव्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. माफी सार्वजनिकपणे मागावी, तसेच ती प्रमुख माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नोटिसमध्ये छापील माध्यमांमध्ये ए४ आकाराची जाहिरात प्रसिद्ध करण्याबरोबरच प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य वृत्तवाहिन्यांवर तसेच सोशल मीडिया खात्यांवर किमान तीन मिनिटांचा सार्वजनिक माफीनामा प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी केल्याचे नोटिसमध्ये म्हटले आहे. यासाठी त्यांनी घटनात्मक आणि कायदेशीर अधिकारांचा वापर करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, असा दावा करण्यात आला आहे. या याचिकेत विविध आरोप, परिस्थितिजन्य बाबी, विसंगती तसेच कागदोपत्री आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा उल्लेख असल्याचेही नोटिसमध्ये नमूद आहे. सालियन यांच्या म्हणण्यानुसार, आदित्य ठाकरे यांनी या कायदेशीर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान त्यांचा हेतू आणि विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या कायदेशीर लढायाला राजकीय कट आणि स्वतःला त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटल्याचा दावा नोटिसमध्ये करण्यात आला आहे. हे आरोप खोटे असून त्यासाठी ठोस पुरावे नसल्याचे सतीश सालियन यांनी म्हटले आहे.
नोटिसमध्ये अनिल देशमुख यांच्या मागील वर्षांच्या वक्तव्याचाही उल्लेख आहे. सतीश सालियन यांच्या याचिकेमागे आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचा कट असल्याचे देशमुख यांनी म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. देशमुख यांचे हे वक्तव्यही बदनामीकारक असल्याचे सालियन यांनी नोटिसमध्ये म्हटले आहे. दरम्यान, दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात यापूर्वी सीबीआयने चौकशी केली असल्याचा उल्लेख नोटिसमध्ये करण्यात आला आहे. अलीकडेच सतीश सालियन यांच्या तक्रारीच्या आ आधारले सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सतीश सालियन यांनी स्वतंत्र चौकशीच्या मागणीवर ठाम असल्याचे नोटिसमधून स्पष्ट केले आहे.














