अभियंत्यांमध्ये कमालीची नाराजी
लोकवाहिनी न्यूज
नागपुर : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे अभियांत्रिकी, जलव्यवस्थापन आणि राष्ट्रनिर्माण क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यांच्या জন্মदिनी, १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात अभियंता दिन साजरा केला जातो. जिल्हा परिषदेतही दरवर्षी अभियंता दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यरत अभियंत्यांच्या गौरवाचा कार्यक्रम साजरा केला जातो. वर्षभरात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जातो. या गौरवामुळे अभियंत्यांना प्रोत्साहन मिळून ते अधिक उत्सावाने काम करण्यास प्रेरित होतात. परंतु, यंदा १५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडून अभियंता दिनाचा कोणताही सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात न आल्याने अभियंत्यांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जात होता. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार व गौरव करण्यात येत असे. या कार्यक्रमामुळे अभियंत्यांना त्यांच्या कामाची दखल घेतली जात असल्याची भावना निर्माण होऊन वर्षभर काम करण्यासाठी प्रोत्साहन व ऊर्जा मिळत होती. या कार्यक्रमामध्ये तिन्ही विभागातील कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यासह संबंधित विभागप्रमुख सहभागी होत असत. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहून अभियंत्यांना मार्गदर्शन करीत असत. त्यामुळे विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासोबतच भविष्यातील कामांचे नियोजन करण्यासाठीही या कार्यक्रमाचा उपयोग होत होता.
लवकरात लवकर कार्यक्रम आयोजित करावा
मात्र, यंदा अभियंता दिनानिमित्त कोणतीही सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात न आल्याने अभियंत्यांमध्ये निराशा व नाराजीची भावना निर्माण झाली असून, अनेक अभियंत्यांनी संघटनेकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने लवकरात लवकर अभियंता दिनाचा गौरव कार्यक्रम आयोजित करून वर्षभरात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करावा, अशी मागणी कास्ट्राइब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी केली आहे.













