डॉ. मोहन भागवत यांचा कळकळीचा सवाल
लोकवाहिनी न्यूज
यवतमाळ : देशात विकास होत असला तरी त्याचा फायदा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नसेल, तर त्या विकासाच्या दिशेचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे. देशातील प्रत्येक नागरिक सुखी आणि समाधानी असेल, तरच देशाचा खरा विकास झाला असे म्हणता येईल. त्यामुळे विकासाची दिशा ठरवताना समाजातील शेवटच्या माणसाचा विचार केंद्रस्थानी असला पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळमध्ये दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यवतमाळमधील दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानच्या सेवाकार्याला यंदा ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. १९९७ मध्ये पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विवेकानंद छात्रवास सुरू करून या सेवाकार्याची सुरुवात झाली. त्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आणि कमी खर्चातील जैविक शेती यांसारख्या उपक्रमांपर्यंत या कामाचा विस्तार झाला.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘अंत्योदय’ विचाराचा उल्लेख करत भागवत म्हणाले की, पूर्वी गरीब व्यक्तीला अनेक अडचणी असूनही पोटभर अन्न मिळत होते आणि तो आनंदी राहायचा. आज अनेकांना अन्न मिळत असले, तरी “आज शेवटचा माणूस खरंच सुखी आहे का?” हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या व्यक्तीचे जीवन अधिक समृद्ध, सुरक्षित आणि चांगले कसे होईल, याचा विचार झाला पाहिजे. देशातील पहिला आणि शेवटचा माणूस यांच्यातील दरी कमी होणे आवश्यक आहे.
शेतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघा
शेतीकडे केवळ उत्पादन किंवा व्यवसाय म्हणून पाहू नये, असेही भागवत यांनी सांगितले. शेतकरी शेतीला जगाच्या कल्याणसाठीचे कर्तव्य मानतो. ही भूमिका एकात्म मानववादाच्या विचाराशी जोडलेली असल्याचे डॉ. मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. रासायनिक शेतीमुळे उत्पादन वाढू शकते; मात्र त्याचे दीर्घकालीन (पान ६ वर)












