विशेष एनआयए न्यायालयाचे निरीक्षण
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : २०२१ मधील अँटिलिया बॉम्बप्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने म्हटले की, वाझे यांच्याविरोधात यूएपीए कायद्याअंतर्गत दहशतवादी कृत्याचा प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध करण्याइतका पुरावा सध्यात दिसत नाही.
२५ फेब्रुवारी २०२१ रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीत जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्रही सापडले होते. ही गाडी व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. त्यानंतर ५ मार्च रोजी ठाणे जिल्ह्यातील एका खाडीत हिरेन यांचा मृतदेह आढळला.
या दोन्ही घटनांचा तपास एनआयेकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणात एनआयएने सचिन वाझे यांच्यासह अनेक जणांविरोधात कट रचल्याचा आरोप केला आहे. तपास यंत्रणेच्या अर्जानुसार, अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्यामागे मोठा कट होता. हिरेन यांची हत्या करून या कटातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये विशेष न्यायालयाने या प्रकरणातील १० आरोपिविरोधात आरोप निश्चित केले होते. मात्र, सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने यूएपीए कलम १५ अंतर्गत दहशतवादी कृत्याचे आवश्यक घटक प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहेत का, याचा विचार केला.
न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, अँटिलियाजवळ सापडलेल्या गाडीत जिलेटिनच्या कांड्या होत्या; मात्र त्यांच्यासोबत डेटोनेटर्स नसल्याने त्या स्फोट घडवून आणण्याच्या स्थितीत होत्या का, याबाबत प्रश्न निर्माण होतो. अंबानी कुटुंबाला या घटनेमुळे दहशत निर्माण झाली होती, हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा जबाब नोंदवण्यात आलेला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे केवळ गाडी आणि धमकीचे पत्र सापडल्याच्या आधारावर यूएपीएअंतर्गत दहशतवादी कृत्यचा प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबत न्यायालयाने वेगळे निरीक्षण नोंदवले. हिरेन यांची हत्या झाली असली तरी ती थेट दहशतवादी कृत्याचा परिणाम असल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही. हा भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत स्वतंत्र गुन्हा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या न्यायालयाच्या निरीक्षणांच्या आधाराने सचिन वाझे यांना १ लाख रुपयांच्या व्यक्तिगत जामीनपात्रावर आणि तेवढ्या रकमेच्या हमीदारावर जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मिळाल्याने वाझे यांच्यावरील इतर आरोप संपलेले नाहीत. प्रकरणातील आरोपांवर पुढील न्यायालयीन प्रक्रिया आणि खटला सुरू राहणार आहे.












