५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित असल्याने नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे. देशात नुकतेच झालेले काँग्रेस जनता पक्षाचे आंदोलन आणि ज्ञानेश कुमार यांचे प्रकरण याचा या निवडणुकीत मोठा प्रभाव राहणार असून यात काँग्रेसचा विजय होईल, असा दावा त्यांनी केला आहे. सरकारची ही लिटमस टेस्ट असून राज्यातील जनता ही कोणाच्या बाजूने आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल, असेही अभिजीत वंजारी यांनी ठासून सांगितले.
अभिजित वंजारी येत्या ५ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरिबेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे माहिती आहे. काँग्रेसने आपले पत्ते उघड केले असले तरी, आपने अजून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांच्या विरोधात भाजपपकडून कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसला तरी, संभाव्य उमेदवार म्हणून सुधाकर कोहळे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. उमेदवारी कोणाला पण मिळो, भाजपच्या उमेदवाराला जिंकून आणायाचे आहे, यासाठी आमची तयारी सुरू असून मी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे, असे सुधाकर कोहळे यांनी सांगितले. या प्रचार मोहिमेदरम्यान त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या काय आहेत, त्या समजून घेतल्या.
भाजपच्या उमेदवाराबाबत उत्सुकता
सध्या भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यावरून मोठी चुरस रंगली आहे. हा मतदारसंघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गृहजिल्हा असल्याने भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे या दिग्गज नेत्यांच्या गृहजिल्ह्यात भाजपचा विजय कोण खेचून आणणार आणि पक्ष नेमका कोणावर आपला डाव अजमावणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिल आहे.













