नागपूर : शहरात हिट अँड रनच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत तब्बल २९२ अपघातांमध्ये वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाले आहेत, या अपघातांमध्ये ६६ जणांचा मृत्यू झाला असून २४१ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडवून वाहनांसह पळून जाणाऱ्या चालकांचा शोध घेणे नागपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान करत आहे.
शहरातील विविध भागात रात्री उशिरा तसेच पहाटेच्या सुमारास हिट अँड रनच्या घटना घडत असल्याचे तपासातून समोर आले आहे. रस्त्यावर वाहतूक तुलनेने कमी असताना भरधाव वाहनांमुळे अपघात होतात. अपघातानंतर जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी चालक वाहनासह पसार होत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
हिट अँड रनच्या घटनेनंतर आरोपी वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. अपघात नेमका कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वाहनामुळे झाला, याचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जाते. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांसोबतच दुकाने, फॅक्टरी, सोसायटीच्या आणि घरावरील खाजगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जाते.
अनेक घटनांमध्ये वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, अपघातानंतर घटनास्थळावर न थांबता पसार होण्याच्या प्रवृत्तीमुळे पोलिसांसमोर तपास अधिक गुंतागुंतीचा होत आहे, काही घटनांमध्ये अपघातग्रस्त वाहनाचे तुकडे, क्रमांकाची अस्पष्ट माहिती किंवा प्रत्यक्षर्षांच्या मदतीने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. रात्रीच्या वेळी भरधाव वाहन चालविणे, वाहनावरील नियंत्रण गमावणे आणि अपघातानंतर मदतीऐवजी पलायन करणे, यामुळे नागपूरच्या रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
एमआयडीसी परिसरातील हिट अँड रनची घटनाही डोकेदुखी ठरत आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तो अपघाताच्या ठिकाणी झोपून होता. हा व्यक्ती या ठिकाणी कसा काय झोपला, याचा तपास करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
पुलांवर सायकलींचा धोका
कोणत्याही उड्डाणपुलावर सायकल चालवण्याची मनाई असते. मात्र नागपुरातील अनेक उड्डाणपुलांवर सायकल चालक दिसतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलावरील अपघातही सायकलीमुळे घटना. सायकलस्वार बालक थकल्यामुळे त्याने सायकल वळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला धडक बसल्याचे प्राथमिक तपासात आढळले.













