खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे करण्यात आली “वस्त्र तुला”
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा सल्ला देऊनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्या वाढदिवशी झालेल्या वस्त्र तुलेनंतर, त्यांच्या वजनाएवढी वस्त्रे गरजूंना दान करण्याचा निर्णय घेऊन समाजकारणाचा संदेश कार्यकर्त्यांना दिला. देशाच्या विकासाला नवे आयाम देणारे, जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विकासपुरुष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे २७ मे रोजी “वस्त्र तुला” सोहळा आयोजित करून अनोख्या पद्धतीने गडकरींचे अभिनंदन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साह, भावना आणि सामाजिक संवेदनांनी भारावलेला ठरला.
एट्रिको हाइट्स येथे पार पडलेल्या या विशेष उपक्रमासाठी आकर्षक तुला उभारण्यात आली होती. फुलांच्या सजावटीने, वस्त्रांच्या राशींनी, शुभेच्छांच्या वर्षावाने आणि मंगलमय वातावरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि शंखनादाच्या मंगल स्वरांत “वस्त्र तुला” विधीला प्रारंभ झाला. एका पारड्यात नितीन गडकरी विराजमान झाले, तर दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाइतकी वस्त्रे ठेवण्यात आली. “जिवेत शरद शतम”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आपल्या लाडक्या नेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवर्जून उपस्थिती लावली.
केंद्रीय मंत्र्यांच्या इच्छेनुसार या उपक्रमातून संकलित झालेली सर्व वस्त्रे उन्हातान्हात कष्ट करणारे हॉर्स, श्रमिक, हातावर पोट भरणारे कामगार तसेच गरजू बांधवांना सन्मानपूर्वक वितरित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी दिली. समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता जपत नितीन गडकरींचा वाढदिवस साजरा करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी समितीचे उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर व अशोक मानकर, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, खा. माया इवनाते, अविनाश घुसे, रेणुका देशकर, चेतन कायकर, किशोर पाटील, मनीषा काशीकर, योगेश बन, प्रमोद पेंडके, विजय फडणवीस, शैलेश ढोबळे, गुहू त्रिवेदी, महेंद्र राऊत तसेच समितीचे इतर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.












