विविध विषयांची निवेदने स्वीकारली
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम जवळपास नऊ वर्षांनी महाल येथील गडकरी वाड्यावर आयोजित करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी गडकरी यांना विविध विषयांवरील निवेदने सोपविण्यात आली.
जनसंपर्क कार्यक्रमासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गडकरी वाड्याचे दोन्ही मजले नागरिकांच्या गर्दीने व्यापलेले होते. याशिवाय बाहेरच्या परिसरात देखील मोठी रांग होती. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी विविध योजनांतर्गत मदतीसाठी गडकरी यांना निवेदन दिले. तर काही सामाजिक व धार्मिक संस्थांनी देखील प्रशासकीय कामात येणाऱ्या अडचणींविषयी त्यांच्याशी चर्चा केली. महाल येथील गडकरी वाड्यावर आगमन झाल्याबद्दल धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील संस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. व्यापारी संघटनांनी देखील महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. वैद्यकीय मदतीसाठी निवेदन देणाऱ्या नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
विविध विषयांवर चर्चा
जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांनी स्थानिक पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, तसेच सामाजिक कल्याणाशी निगडित विविध विषयांवरही गडकरी यांच्याशी चर्चा केली. यावेळी काही इनोव्हेटिव्ह कल्पना देखील तरुणांनी त्यांच्यापुढे मांडल्या. त्यांनी या कल्पनाचे कौतुक करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू कार्यालय आदी शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी देखील जनसंपर्क कार्यक्रमात उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि तक्रारींवर गडकरी यांनी त्याच क्षणी उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. तर काही प्रकरणांमध्ये फोनवरून संबंधितांना तातडीने समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. नागपूरसह संपूर्ण विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील तसेच महाराष्ट्राबाहेरून मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यांमधील नागरिकांनी यावेळी जनसंपर्क कार्यक्रमात गडकरी यांना निवेदने दिली.











