लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नुकताच पार पडलेल्या ऐतिहासिक मारबत उत्सवात महापालिकेने घेतलेला सहभाग आणि जाहिरातींवर केलेल्या निधीच्या खर्चावरून राजकीय वातावरण तापले आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यानेही मंगळवारी प्रशासन व सत्ताध्यायांवर टीका करीत हिसाब मागितला. आज, बुधवारी सभेपूर्वी काँग्रेस नगरसेवकाने टीशर्टवरील घोषणेतून लक्ष वेधले.
शैलेश पांडे यांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेपूर्वी मारबत उत्सवासाठी करण्यात आलेली २ कोटी रुपयांची तरतूद, श्रावण महोत्सव, पदग्रहण समारंभ तसेच पदाधिकाऱ्यांच्या कक्षांच्या दुरुस्तीसाठी होणारा खर्च यावर त्यांनी सवाल उपस्थित केले. पांडे यांच्या टी-शर्टवर ‘मनपाच्या पैशाची उधळपट्टी’ असा ठळक संदेश होता. त्याखाली मारबत उत्सवासाठी २ कोटी रुपये, श्रावण महोत्सव, पदग्रहण समारंभ, पदाधिकाऱ्यांच्या कक्षांसाठी लाखो रुपयांचा खर्च तसेच ‘५ लाख झाडांचे वृक्षारोपण कागदावरच?’ अशा मुद्दयांकडे लक्ष वेधले.
मारबत महोत्सवासाठी यंदा मनपाच्या अर्थसंकल्पात २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या खर्चाचा संपूर्ण तपशील जाहीर करण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक ११च्या विकासासाठी निधी मिळत नसल्याचा आरोप करत पांडे यांनी मनपा इमारतीबाहेर हातात प्रतीकात्मक भांडे घेऊन ‘भीक मागो’ आंदोलन केले. विकास निधीच्या वाटपात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
नागपूरच्या सर्वसाधारण विकास निधीवर केवळ भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्याच हक्क आहे का?’ असा सवाल पांडे यांनी उपस्थित केला. महानगरपालिकेच्या विविध प्रभागांना वितरित करण्यात आलेल्या विकास निधीची संपूर्ण यादी सार्वजनिक करावी, तसेच कोणत्या प्रभागाला किती निधी मंजूर झाला, कोणत्या कामांसाठी निधी देण्यात आला आणि प्रत्यक्षात किती निधी खर्च झाला, याचा तपशील नागपूरकरांसमोर जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.













