उपराजधानीत ३५ फ्लायओव्हर आणखी १५ प्रस्तावित
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : वाहतूक कोंडी, वाढती लोकसंख्या आणि शहराचा झपाट्याने होणारा विस्तार यामुळे नागपूरच्या रस्त्यांवर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, याच वेगाने शहराच्या आकाशरेखेतही बदल होत आहे. उड्डाणपुलांच्या बाबतीत नागपूर आता राज्याची नवी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबईनंतर सर्वाधिक उड्डाणपूल असलेल्या शहरांमध्ये नागपूरचा समावेश होत आहे. सध्या शहरात तब्बल ३५ उड्डाणपूल उभे आहेत.
मुंबईत ५५ पेक्षा अधिक उड्डाणपूल आहेत. त्या तुलनेत नागपूरने अवघ्या काही वर्षांत उड्डाणपुलांचे मोठे जाळे उभे केले आहे. विशेष म्हणजे, नागपूरच्या या यादीत केवळ संख्येचा विक्रम नाही, तर वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांचीही भर आहे. राज्यातील पहिला डबलडेकर उड्डाणपूल नागपुरातच साकारला गेला. रस्ता, त्यावर पूल आणि त्यावर मेट्रो असा हा विक्रम आहे. वाहतूक व्यवस्थेतील अभियांत्रिकीचा अनोखा प्रयोग म्हणून त्याची देशभर चर्चा झाली.
इंदोरा-दिघोरी उड्डाणपूल हा राज्यातील सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलांपैकी महत्वाचा आणि क्रमांक एकचा पूल ठरला आहे. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहतूक वेगाने नेण्यासोबतच अनेक महत्वाच्या चौकांवरील कोंडी कमी करण्यासाठी या प्रकल्पांचा उपयोग होत आहे.
संत्रानगरीतही होणार पन्नाशी
आता नागपूरच्या उड्डाणपुलांच्या शर्यतीत आणखी एक मोठी भर पडणार आहे. शहरात अतिरिक्त १५ उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. हे सर्व प्रकल्प प्रत्यक्षात साकारले तर नागपूरमधील उड्डाणपुलांची संख्या सुमारे ५० पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे मुंबईच्या ५५ पेक्षा अधिक उड्डाणपुलांच्या विक्रमाला नागपूर थेट आव्हान देईल.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाणपूल हे महत्वाचे साधन ठरत असले, तरी वाढत्या पुलांसोबत रस्त्यांचे नियोजन, सार्वजनिक वाहतूक, पादचारी सुविधा आणि वाहतूक व्यवस्थापन यांचाही समतोल राखण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे. मात्र वेगाने बदलते नागपूर आगामी काळात उड्डाणपुलांचे शहर म्हणून नवी ओळख मिळवेल यात शंकाच नाही.












