लोकवाहिनी न्यूज
नागपूर : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) २०२६ ते २०३० या कालावधीसाठीच्या कार्यकारी निवडणूक समितीत विद्यमान अध्यक्ष अरुण लखाानी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासोबतच छत्रपती संभाजीनगरचे शिरीष बोराळकर यांची कार्याध्यक्षपदी, मंगेश काशीकर यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी तर अनुभवी संघटक सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आहे.
या प्रमुखांच्या नेतृत्वामुळे राज्यातील बॅडमिंटन वर्तुळाला नवी दिशा आणि भक्कम प्रशासकीय पाठबळ लाभले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तथा निवडणूक निर्णय अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) अरुण चौधरी यांनी अधिकृतरीत्या वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. सर्वच पदांसाठी प्रत्येकी एकच वैध अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.
राज्यातील बॅडमिंटनचा पाया अधिक मजबूत करण्यात आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अरुण लखाानी यांचे योगदान मोठे राहिले आहे. आता त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष म्हणून शिरीष बोराळकर आणि मानद सरचिटणीस म्हणून सिद्धार्थ पाटील हे मराठवाड्याचे दोन खंदे नेतृत्व एमबीएच्या कारभाराची प्रमुख धुरा सांभाळणार आहेत. तसेच नागपूरचे मंगेश काशीकर यांच्याकडे वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यांच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. या कार्यकारिणीत युवा पदाधिकारी यांची संख्या भरपूर असून संघटनेचा युवा चेहरा आगामी काळात बॅडमिंटन खेळाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यास कारणीभूत ठरणार आहे. यंग टीममुळे ग्रामीण व निमशहरी भागातील खेळाडू, स्पर्धांचे नियोजन आणि संघटनात्मक मजबुतीकरणाला मोठी गती मिळणार आहे.
कार्यकारिणीतील अन्य महत्त्वाची पदे
वरिष्ठ उपाध्यक्षपदी नागपूरचे मंगेश विजय काशीकर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी श्रीमती वृषालीराजे भोसले (सातारा), पंकज ठाकूर (पालघर), ओंकार हजारे (रत्नागिरी), परेश ठाकूर (रायगड), जोवेल चांदेकर (चंद्रपूर) आणि विजय फळसकर (बुलढाणा) हे विराजमान होणार आहेत. तसेच स्पर्धा सचिवपदी प्रसाद गोखले (पालघर), सी. ओंड डी. सचिवपदी आनंद जोशी (पुणे), मानद कोषाध्यक्षपदी जगदीश जोशी (नागपूर) आणि मानद सहसचिवपदी सचिन भारती (जीएमबीए) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राज्य बॅडमिंटनचे वैभव उंचावेल
याशिवाय ११ सदस्यीय नियामक मंडळात (एक्झिक्युटिव्ह कौन्सिल) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. लखाानी, बोराळकर व पाटील यांच्या अनुभवी व दूरदृष्टी नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे बॅडमिंटन वैभव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी उंचावेल, असा विश्वास राज्यातील जिल्हा संघटना आणि क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.














