नागपूर : शहरातील वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमरावती मार्गावरील वाडी उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ पत्रकार मिलिंद काशीनाथ गायधने (वय ६०) गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघेही जखमी झाले असून, एका कारचेही नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज येथील आदित्य दीपक खंडेलवाल हे मंगळवारी रात्री कुटुंबासह एमजी विंडसर कारने गरबा खेळण्यासाठी अमरावती रोडच्या दिशेने जात होते. त्याचवेळी वाडी उड्डाणपुलावर मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने (एमएच-४९-सीव्ही-३३००) पुढे जाणाऱ्या मिलिंद गायधने यांच्या दुचाकीला (एमएच-३०-क्यू-३६३५) धडक दिली.
या धडकेत गायधने गंभीर जखमी झाले. त्यानंतर संबंधित दुचाकीची कारलाही धडक बसल्याने कारचे नुकसान झाले. अपघातात दुचाकीवरील चालक आणि त्याच्यासोबत असलेली व्यक्तीही जखमी झाली. तिघांनाही उपचारासाठी लक्ष रुग्णालयात दाखल करण्यात आले. गायधने यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना पुढील उपचारासाठी रामदासपेठ येथील एआरआयएस रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी तक्रारीच्या आधारे वाडी पोलिसांनी दुचाकीचालक आश्रय डागा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.














