ज्ञानेश कुमारांविरोधात पायी मोर्चानंतर बाइक रॅली, प्रचंड घोषणाबाजी
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसने नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केले. पहिल्या दिवशी पायी मोर्चा काढल्यानंतर गुरुवारी, १५ ऑक्टोबरला काँग्रेसच्या वतीने बाइक रॅली काढण्यात आली. या वेळी ज्ञानेश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
रामेश्वरी परिसरातील त्रिशरण चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दत्तात्रय नगर येथील महाकाळकर सभागृहापर्यंत ही रॅली काढण्यात आली. काँग्रेसच्या ‘व्होट वाचवा, देश वाचवा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात नागपुरातून करण्यात आली.
रॅलीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सिरिवेल्ला प्रसाद, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील आणि आमदार अभिजित वंजारी सहभागी झाले होते. त्यांच्यासह काँग्रेसच्या विविध ब्लॉक कमिटींचे सदस्य, नगरसेवक आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पहिल्या दिवशी पायी मोर्चा आणि दुसऱ्या दिवशी बाइक रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसने आपले आंदोलन पुढे सुरू ठेवले. ‘व्होट वाचवा, देश वाचवा’ अभियानाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्दे उपस्थित करत काँग्रेसने नागपुरातून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे.












