उत्सवात उधळला जाणार राजकीय गुलाल
प्रसन्न जकाते
नागपूर : नागपुरात गोकुळाष्टमीनंतर आता उत्सवांच्या माध्यमातून राजकीय शक्तिप्रदर्शनाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे आहेत. दहीहंडी उत्सवात काही मोजक्या ठिकाणी दिसलेले राजकीय शक्तिप्रदर्शन आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात अधिक व्यापक स्वरूपात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आपल्या मंडळाच्या उत्सवाला दिग्गज नेत्यांची उपस्थिती मिळावी, यासाठी राजकीय कार्यकर्त्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार कृपाल तुमाने यांना गणेशोत्सव तसेच नवरात्रातील गरबा उत्सवासाठी निमंत्रित करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माजी आमदार संदीप जोशी, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, मनपा स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी आणि नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
उत्सवांच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावत आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा सिलसिला सुरू आहे. मात्र, यंदा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही विविध उत्सवांना उपस्थित राहावे, यासाठी काही कार्यकर्त्यांकडून प्रयत्न केले जात असल्याचे चित्र आहे.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती म्हणजे केवळ उत्सवातील मानाची बाब न राहता आपल्या राजकीय ताकदीचे प्रदर्शन करण्याची संधी, अशी कार्यकर्त्यांची धारणा असल्याने निमंत्रणांसाठी चढाओढ होण्याची शक्यता आहे.
फडणवीस, गडकरी आणि डॉ. भागवत यांना झेड-प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सुरक्षा यंत्रणेला मोठी कसरत करावी लागते. त्यांच्या ताफ्याच्या संभाव्य मार्गांवर कार्यक्रमाच्या दीड तास आधीपासूनच पोलिस बंदोबस्ताची तयारी करावी लागते. गडकरी यांचे निवासस्थान, हॉटेल रेडिसन ब्लू, महालमधील गडकरी वाडा तसेच संघ मुख्यालयाच्या परिसरात नियमित सुरक्षा व्यवस्था असते.
फडणवीस यांच्या त्रिकोणी पार्क परिसरातील निवासस्थानाबाहेरही पोलिस बंदोबस्त तैनात असतो. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात हे अतिमहत्त्वाचे व्यक्ती कुठे-कुठे उपस्थित राहू शकतात, याची माहिती पोलिस विभागाकडून आतापासूनच संकलित केली जात आहे.
अलीकडच्या काळात संविधान सन्मान यात्रा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, आरक्षण आंदोलन, पेपरफुटी, एमपीएससीमधील कथित गैरप्रकार तसेच महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यांवर राज्याच्या विविध भागांत आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर झेड-प्लस सुरक्षा असलेल्या नेत्यांचे नागपुरातील सार्वजनिक कार्यक्रम सुरळीत पार पाडणे हे पोलिसांसाठी आव्हान ठरण्याची शक्यता आहे. ‘नसती डोकेदुखी नको’ म्हणून संभाव्य आंदोलनांचा विचार करून पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले आहे.
फडणवीस यांच्या संभाव्य भेटींच्या दृष्टीने विमानतळ ते सिव्हिल लाइन्स, जयप्रकाश नगर, महाल, नरेंद्र नगर, शताब्दी चौक, रामनगर, धरमपेठ, बर्डी, टेकडी गणेश मंदिर परिसर, बडकस चौक, शंकरनगर, मानेवाडा, लक्ष्मीनगर, जरीपटका, सदर आणि प्रतापनगर या भागांवर पोलिसांची विशेष नजर राहण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू
नागपूर शहर पोलिसांसह राज्य गुप्तवार्ता विभाग आणि आयबीकडूनही झेड-प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींच्या संभाव्य हालचालींची माहिती गोळा केली जात आहे. एकीकडे उत्सवांच्या माध्यमातून आपल्या नेत्यांची उपस्थिती मिळवून राजकीय वजन दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे, तर दुसरीकडे या व्हीव्हीआयपींच्या संभाव्य दौऱ्यांमुळे पोलिस यंत्रणाही तयारीला लागली आहे. आता कोणत्या मंडळाच्या उत्सवाला कोणता दिग्गज नेता हजेरी लावतो आणि त्यातून नागपुरात राजकीय गुलाल किती उधळला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.











