मांडळ-आंभोरा मार्गावर भीषण अपघात, एक गंभीर जखमी
लोकवाहिनी न्यूज
कुही : मांडळ-आंभोरा मार्गावरील करूणा हॉस्पिटलसमोर सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११:४५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर इतर दोघे जखमी झाले. मृतकाचे नाव रामकृष्ण विलास पडोळे (वय २१, रा. कुजबा) असे आहे तर जखमींची नावे अजय उत्तम तिजारे (वय २३) व अनुप बंडू मोहतूरे (वय २१) दोघेही रा.कुजबा असे आहे. हा भीषण अपघात बोलेरो पिकअप गाडीने अचानक रस्ता ओलांडला व रस्त्यात आडवा झाल्याने झाला, असे प्रत्यक्षदर्शी व अपघाताच्या ठिकाणावरून दिसून येते. फिर्यादी अनुप बंडू मोहतूरे याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, तो आणि त्याचा मित्र अजय तिजारे हे दोघे सोमवारी सकाळी १० वा. मोटारसायकल क्र.एम एच ४० डी डी २१६७ कुजबा येथून कुही तहसील कार्यालयात उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी गेले होते. दाखला घेऊन गावाकडे परत येत असताना मांडळ बस स्टँडजवळ त्यांचा दुसरा मित्र रामकृष्ण विलास पडोळे हा मांडळला काही कामानिमित्त मांडळ येथे आला होता. त्याने अजय तिजारेला फोन करून मांडळ बसस्थानकावर भेट घेतली.
अजय हा रामकृष्ण याची मोटारसायकल क्र. एम एच ४० सी डब्लू ०९३१ असून त्यांच्यासोबत गावाकडे जाायला निघाले. मांडळ आंभोरा रोडने जात असताना, करूणा हॉस्पिटल मांडळ समोर समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडी क्र. एम एच ४० बी एल ९७५३ च्या चालकाने आपली गाडी अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूकडून पलटी करण्याच्या हेतूने आडवी आणली. त्यामुळे रामकृष्ण पडोळे याची मोटारसायकल थेट पिकअपवर जाऊन धडकली. या भीषण धडकेत पिकअपच्या मागेच असलेल्या फिर्यादीची मोटारसायकल सुद्धा जाऊन आदळली. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की, मोटारसायकलवरील चालक रामकृष्ण विलास पडोळे हा खाली फेकला जाऊन गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेला अजय तिजारे आणि फिर्यादी अनुप मोहतूरे हे सुद्धा या अपघातात जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी करूणा हॉस्पिटल, मांडळ येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी कुही पोलिस ठाण्यात बोलेरो पिकअप चालकाविरुद्ध बी.एन.एस.-२०२३ च्या कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) तसेच मोटर वाहन कायद्याच्या (एम व्ही ॲक्ट) कलम १३४/१७७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धीरज मसराम हे करत आहेत.












