नागपुरातील तरुणाईला लागले अजब व्यसन
प्रसन्न जकाते
नागपूर : एक ग्रॅम एमडी किंवा हेरॉईन पावडरसाठी आता दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत असल्याने नागपुरातील तरुणाईने आता ड्रग्सच्या नशेसाठी अजब फंडा शोधून काढला आहे. इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग्स रक्तात सोडल्यानंतर सुई आणि सिरेंजच्या मदतीने रक्तातून एकमेकांना नशा दिला जात असल्याचा धोकादायक प्रकार आता सुरू झाला आहे.
ड्रगटुटिंग किंवा ब्लुटुथिंग नावाचा हा प्रकार आहे. या प्रकारामुळे फिजीमध्ये २३ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रक्तातून एचआयव्हीचे सर्वाधिक संक्रमण झालेला फिजी हा जगातील पहिला मोठा देश ठरला आहे. याच ब्लुटुथिंगच्या नादी नागपुरातील तरुणाई जात आहे.
पार्टींमध्ये सामूहिक नशा करायची असल्यास जास्त प्रमाणात एमडी किंवा हेरॉईन खरेदी करावी लागते. मात्र इतके प्रचंड बजेट नसलेल्या तरुणाईला हा फंडा तस्करांकडूनच शिकविला जातो. यात एका व्यक्तीला इंजेक्शनचे ड्रग दिले जातात. नशेचा अंमल चढल्यानंतर सिरेंजने नशा चढलेल्या व्यक्तीच्या नसेतून रक्त काढत ते इतरांना टोचले जाते.
फिजी आणि दक्षिण आफ्रिकेत सध्या या ब्लुटुथिंगचे भीषण रूप दिसत आहे. त्यामुळे नागपुरात ब्लुटुथिंग करण्यापूर्वी नशा झालेल्या व्यक्तीच्या रक्ताची एचआयव्ही किटवर चाचणी केली जाते. एचआयव्ही किटवर चाचणी निगेटिव्ह आल्यास इतर मंडळी रक्त टोचून घेतात. मात्र यामुळे हेपेटायटिस बी, सी, एचपीव्ही व्हायरस यांचा धोका टळत नाही. इतकेच नव्हे तर रोगप्रतिकार शक्तीवरही त्याचा परिणाम होतो.
ब्लडग्रुप, इंजेक्शनचे ज्ञान
कोणाचा ब्लड ग्रुप कोणता आहे, याची माहिती घेतल्यानंतरच ब्लुटुथिंग केले जाते. यासाठी ड्रग घेणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील काही तरुण, तरुणींची मदत देखील घेतली जाते. अलीकडच्या काळात नागपुरात ड्रग घेण्याचा हा नया ट्रेंड सुरू झाला आहे. सध्या त्याचे प्रमाण अत्यंत मर्यादित आहे, मात्र ड्रग घेण्यासाठी पैसे कमी पडले तर नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाईमध्ये हा फंडा वाढण्याचा धोका आहे.












